स्टेट बँकेने ठेवींवरील व्याजदर घटविले

मुंबई, दि. ८ – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतीच विशिष्ट मुदतींच्या ठेवींवरील व्याजदरांमध्ये पाव टक्क्यांची कपात केली आहे. बँकेने किरकोळ म्हणजेच २४० दिवस मुदतीपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी केले असून हा बदल शुक्रवार, ८ जूनपासून लागू झाला आहे.

रिझर्व्ह बँक १८ जून रोजी मध्य तिमाही पतधोरण जाहीर करणार आहे. विकासाला चालना देण्यासाठी ०.२५ टक्क्यांनी ‘रेपो‘ दर कमी होण्याची शक्यता आहे, असे संकेत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांनी नुकतेच दिले आहेत. एप्रिलमध्ये वार्षिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेने ‘रेपो‘ दरात अर्धा टक्का कपात केली होती. परिणामी बहुतेक बँकांनी आपले मुदत ठेवींवरील व्याजदर एक टक्क्याने घटविले होते.