विकास घटण्यास व्याजदर कारणीभूत नाहीत

मुंबई : चढय़ा व्याजदरामुळेच सकल घरेलू उत्पादनाचा विकासदर गेल्या ९ वर्षांत नीचांकी स्तरावर आल्याची टीका  आतताईपणाची असून विकास खुंटण्यास केवळ चढे व्याजदर कारणीभूत नसल्याची भूमिका रिझर्व्ह बँकेने घेतली आहे.

रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी ही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, व्याजदर प्रचंड आहेत किंवा विकासदर परिणाम करणारे आहेत, असे मला वाटत नाही. विकासदर घटण्यास अनेक कारणे आहेत; मात्र आम्ही व्याजाच्या मुद्दय़ालाच अधिक महत्त्व देत आहोत. विकासदरातील घसरणीत उत्पादनातील घट, क्षमतेत कमतरता आणि महागाई दराचा किती वाटा आहे, हे मला माहीत नाही. असे असूनही महागाईचा दर ८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे व  आर्थिक वृद्धीही घसरली आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर उद्योग जगताकडून कडाडून टीका होत आहे.

मात्र व्याजदरांचा परिणाम विकासदरावर होतो, अशी कबुलीही त्यांनी या वेळी दिली. ते म्हणाले की, व्याजदरांनी आर्थिक विकासावर परिणाम होतो, असे आम्ही म्हणत आहोत. महागाई देखील विकासावर परिणाम करण्यास कारणीभूत ठरते. महागाई घटल्यास व्याजदरही खाली येतील. यात केवळ चढय़ा व्याजदरामुळे व विकासदरात घसरण झाली, असे म्हणणे आतताईपणाचे ठरेल.