मसाले पदार्थांच्या निर्यातीतून तीन अब्ज डॉलर मिळविण्याचे लक्ष्य

मुंबई, दि. ८ – मसाल्याच्या पदार्थांना परदेशात वाढती मागणी आहे. येत्या पाच वर्षांच्या कालावधीत मसाल्यांच्या निर्यातीतून होणारी उलाढाल तीन अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. चालू पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये मसाल्यांच्या निर्यातीतून तीन अब्ज डॉलरची उलाढाल करण्याचे लक्ष्य निश्चित केले असल्याचे मसाले बोर्डाचे संचालक (विपणन) एम. आर. सुदर्शन यांनी सांगितले.

औद्योगिक संघटना पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने (पीएचडीसीसीआय) आयोजित केलेल्या भारतीय मसाल्यांच्या निर्यात वाढीवरील चर्चेत सुदर्शन बोलत होते. आजच्या घडीला मसाल्यांच्या निर्यातीतून १.५ अब्ज डॉलरची वार्षिक उलाढाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातून ३२ लाख टन विविध मसाल्यांची निर्यात केली जाते. एकूण विदेशी व्यापारामध्ये हे प्रमाण ५० टक्के एवढे आहे.

२०१०-११ या आर्थिक वर्षामध्ये देशातून पाच लाख २५ हजार ७५० टन मसाल्यांची पिके व सहा लाख ८४ हजार ७१ कोटी लाख रूपये मूल्यांच्या मसाल्यांच्या पदार्थांची निर्यात करण्यात आली. भारतीय मसाले उत्पादनांची वर्षागणिक मागणी वाढत आहे. नवनव्या पदार्थांचा समावेश करून निर्यात वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकताही सुदर्शन यांनी यावेळी व्यक्त केली.