आशियाई कनिष्ठ बुद्धीबळ स्पर्धेत ॠचा पुजारीला कांस्यपदक

कोल्हापूर, दि. ९ – उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे आयोजित केलेल्या आशियाई ज्युनिअर बुद्धीबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ॠचा पुजारीने कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत भारताच्या इव्हाना फरताडीने सुवर्ण तर व्हिएतनामच्या वो थि फूंग ने रौप्य पदक पटकावले. जागतिक बुद्धीबळ  महासंघ, एशियन चेस फेडरेशन, नॅशनल चेस फेडरेशन ऑफ उझबेकिस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

अत्यंत अटीतटीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत यजमान उझबेकिस्तानसह भारत, कझागिस्तान, किरगीस्तान, तझाकिस्तान, व्हिएतनाम आदी देशांतून एकूण २२ नामंकित खेळाडू सहभागी झाले होते.

ॠचाने पहिल्या चार सलग डावात उझबेकिस्तान, तझाकिस्तान व मायदेशातील प्रतिस्पर्ध्यांना हरवून स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला होता. पाचव्या फेरीत तिला व्हिएतनामच्या वो थि किंग फूंगकडून पराभव पत्करावा लागला, तर सहाव्या फेरीत तिला भारताच्या इव्हाना फरताडे विरूद्ध बरोबरी स्विकारावी लागली. त्यानंतर सातव्या व आठव्या फेरीत तिने व्हिएतनाम व उझबेकिस्तानच्या खेळाडूंना हरविले. शेवटच्या नवव्या फेरीत तिला भारताच्याच जे. सरन्याकडून पराभव पत्करावा लागला व ६.५ गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

आशियाई ज्युनिअर बुद्धीबळ स्पर्धेत ॠचा प्रथमच सहभागी झाली होती. कांस्य पदकामुळे तिला पुढील वर्षी शारजा येथे होणा-या आशियाई ज्युनिअर स्पर्धेत तसेच जागतिक ज्युनिअर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. ॠचा हिला आई-वडिलासंह ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.

Leave a Comment