ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानात १५ दहशतवादी ठार

इस्लामाबाद दि.४- सोमवारी भल्या पहाटेच पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्थान भागातील मीर अली भागात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात १५ दहशतवादी ठार झाले असल्याचे पाकिस्तानच्या गुप्तवार्ता विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले आहे. रविवारीही दक्षिण वझिरास्तान भागात ड्रोन हल्ले करण्यात आले त्यात एका तालिबानी नेत्यासह १० जण ठार झाले आहेत.

सोमवारी सकाळीच अफगाणिस्तान सीमेजवळ असलेल्या भागात मीरनशाह या वझिरीस्तानच्या राजधानीपासून १५ मैलावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली. हा आदिवासी भाग गेले अनेक दिवस तालिबानी आणि अल कायदाच्या दहशतवाद्यांचा अड्डा बनला आहे. येथूनच त्यांच्या कारवाया आखल्या आणि केल्या जातात व त्यामुळेच अमेरिकेने या भागालाच आपले मुख्य लक्ष्य बनविले आहे. गेल्या पंधरवड्यात केलेला हा आठवा ड्रोन हल्ला आहे.

पाकिस्तानी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात ठार झालेल्यांची ओळख अद्यापी पटलेली नाही कारण सर्वच प्रेते ओळखण्यापलिकडे आहेत. रविवारी झालेल्या हल्ल्यात तालिबानी नेता ठार झाला असून त्याच्या मृत्यूची सभा घेण्यात येत असलेल्या घरावरच ड्रोन डागले गेल्याने घराची पडझड झाली तसेच १० जण ठारही झाले होते.