बनावट नोटांप्रकरणी भारत अमेरिकेचे तंत्रज्ञान सहाय्य घेणार

नवी दिल्ली दि.४- भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा देणार्‍या बनावट नोटांचा बंदोबस्त करण्यासाठी भारत अमेरिकेकडे त्यांच्या तंत्रज्ञानाचे सहाय्य मागणार असल्याचे समजते. वॉशिंग्टननेही बनावट अमेरिकन डॉलर्सला पायबंद घालण्यासाठी या तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर केला आहे. भारत सरकारलाही या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची इच्छा असून त्यासंबंधी वॉशिंग्टन येथे या महिनाअखेर होत असलेल्या स्ट्रीटीजी डायलॉगच्या वेळी तंत्रज्ञान देण्याविषयीची विनंती भारताकडून केली जाणार आहे असे सांगण्यात आले आहे. केंद्रीय गृहसचिव आर.के सिंग या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

अमेरिकेने बनावट डॉलर्सचा शोध घेण्यासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानानुसार प्रत्येक डॉलरची नोंद ठेवली जाते. हा डॉलर कुठे तयार झाला, त्याचा प्रवास कुठून कुठे झाला व असे डॉलर आणणारे नागरिक कोण याचा स्वतंत्र डेटाबेसच तयार करण्यात आला आहे. भारतात पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर बनावट चलनी नोटा येतात. या नोटा चलनांत वितरीतही केल्या जातात. गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी बनावट नोटा छापणे, वितरित करणे, तस्करी करून आणणे तसेच अमली पदार्थ तस्करी करणार्‍यांना जबर शिक्षा ठोठावली जाईल असे नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार या कामी अमेरिकन तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.