अवैध अफू लागवड प्रकरणी २७ केसेस दाखल

पुणे दि.४-राज्यातील अवैध अफू लागवड प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची बैठक पुण्यात दोन महिन्यानंतर प्रथमच झाली असून यात आठ जिल्ह्यात मिळून २७ केसेस दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या २७ मध्ये पुणे जिल्ह्यातील तीन केसेस आहेत.

राज्य शासनाने अवैध अफू लागवडीचा तपास करण्यासाठी ६ सदस्यांचे विशेष तपास पथक स्थापन केले असून या पथकाच्या आत्तापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. पुणे हे या पथकाचे मुख्य केंद्र आहे. पथकाचे प्रमुख सांगली जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस सुपरिटेंडेंट दिगंबर प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व २७ केसेसमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तपासात मराठवाडा भागातून जाणारे ट्रकचालक हे या अफूचे मुख्य ग्राहक असल्याचेही उघडकीस आले आहे.

या वर्षाच्या फेब्रुवारीच्या २३ तारखेला परळी तालुक्यात ४९ एकर जमीनीत अवैध अफू लागवड झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पाच दिवसांतच सांगली जिल्हयात घातलेल्या धाडीत १० एकर अफू लागवड आढळून आली होती. पोलिसांनी सुरूच ठेवलेल्या धाडसत्रांत नंतर पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यातही अफू लागवड करण्यात आल्याचे दिसून आले होते असे सांगून प्रधान म्हणाले की या प्रकरणात सहा व्यापार्‍यांसह १०५ आरोपी असून त्यातील ८४ जणांना अटक करण्यात आली आहे.सर्व सहा व्यापार्‍यांना अटक झाली असून बाकीचे अफू उत्पादक आहेत. तपासात ५७ टन अफू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत सव्वातीन कोटी रूपये आहे. ही अफू वाळवून भुसा स्वरूपात विकली जात होती आणि तंबाखूप्रमाणेच ती खाल्ली जाते असेही त्यांनी सागितले.

अफू लागवड व व्यापार संबंधात अजूनतरी राज्याबाहेरचे धागेदोरे मिळाले नसल्याचे प्रधान यांनी सांगितले. ते म्हणाले की हे सर्व दावे संबंधित जिल्ह्यांच्या ठिकाणीच चालविले जाणार आहेत.