मुंबई दि.४- जागतिक बाजारात तसेच भारतातही सोन्याचे भाव नवा उच्चांक गाठत असतानाच आता सरकारने दोन लाख रू. किंमतीपेक्षा अधिक सोने खरेदी करणार्या ग्राहकांसाठी पॅनकार्ड दाखविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असून त्याची घोषणा लवकरच केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोने व्यापारात भाव कमी जास्त होण्यास अन्य कारणांबरोबरच सट्टेबाजी तसेच सोन्याचा काळाबाजारही कारण असतो. सोन्याचे दर वाढले की करचुकवेगिरीलाही उत येतो. ही करचुकवेगिरी रोखण्यासाठी तसेच काळाबाजार आणि सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी पॅनकार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे समजते. या निर्णयामुळे पॅनकार्ड नसणार्या ग्राहकांची अडचण होणार आहे.
दोन लाख रूपयांपेक्षा अधिक अथवा सध्याच्या भावाने ७० ग्रॅम सोने खरेदी करणार्याला पॅनकार्ड दाखविणे जसे बंधनकारक करण्यात येणार आहे तसेच अशा ग्राहकांची नोंद ठेवणे सराफ व्यावसायिकांनाही बंधनकारक केले जाणार आहे. त्यासाठी पॅनकार्ड हाच पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. अशा नोंदी न करणार्या सराफांचा व्यवसाय परवाना रद्द केला जाऊ शकतो असाही इशारा देण्यात आला आहे.
या वर्षअखेरपर्यंत सोन्याचे भाव ३५ हजार रू.तोळाची पातळी गाठतील असा जाणकारांचा अंदाज असून त्यामुळे सोने आयातीतही वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जुलै २०११ मध्ये सोन्याचे भाव १० ग्रॅमला २२ हजार रूपये होता तो आता ३० हजारांची पातळी ओलांडून पुढे गेला आहे. गतवर्षात ९३३ टन सोने आयात केले गेले होते, यावर्षात ही आयात १ हजार टनाचा टप्पा गाठेल असेही तज्ञांचे मत आहे.