शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

गेल्या काही महिन्यांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रंगलेला कलगीतुरा शनिवारी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर साधलेल्या थेट निशाण्यामुळे अधिकच रंगतदार ठरत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीत पवारांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले. सध्या राज्यातील निर्णय प्रक्रीया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्यातले उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात चालले आहेत अशी टीका पवार यांनी केली आहे. आनंद महिंद्रा यांचा प्रकल्प तामीळनाडू येथे तर बाबा कल्याणी यांचा प्रकल्प गुजरातमधील मुंद्रा येथे राज्यातील निर्णय प्रक्रीया ठप्प झाल्यामुळेच गेले आहेत, असेही पवार म्हणाले. राज्य विकासात यामुळेच मागे राहिल्याचे पवार म्हणाले.   

पवार यांच्या या वक्तव्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पवार यांच्या या वक्तव्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलावे, अशा प्रकारे जाहीर वक्तव्य करणे टाळावे असे सांगत ठाकरे यांनी राज्यात आघाडी सरकारचे बरे चालले आहे, अशा प्रकारे पवारांनी वक्तवे करून त्यात मिठाचा खडा घालू नये असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांबद्दल गेल्या काही काळात पवार यांनी सातत्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यात शनिवारी केलेल्या वक्तव्यामुळे आणखीनच भर पडली आहे.