अखेर एन.डी.तिवारी यांनी रक्ताचे नमुने दिले

नवी दिल्ली दि.२९- वरीष्ठ काँग्रेस नेते आणि आंध्राचे माजी राज्यपाल एन.डी.तिवारी यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आज म्हणजे मंगळवारी पालकत्वाचा निर्णय होण्यासंदर्भात रक्ताचे नमुने दिले असल्याचे समजते.  रोहित शेखर या युवकाने तिवारी हेच आपले वडील असल्याचा दावा न्यायालयात दाखल केला असून त्यासांठीच तिवारी यांच्या रक्ताची डीएनए चाचणी केली जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाने गुरूवारीच तिवारी यांच्या रक्ताचे नमुने मंगळवारी घेतले जावेत असे आदेश दिले होते त्यानुसार अपेक्स कोर्टाच्या बेंचचे न्यायाधीश दीपक वर्मा आणि न्यायाधीश एस.एम.मुखर्जी यांनी आज हे नमुने घ्यावेत असे आदेश संबंधितांना दिले. त्यानुसार लॅबारेटरी सदस्य तिवारी यांच्या घरी गेले. त्यात डेहराडून सिव्हील हॉस्पिटलमधील सर्जन, पॅथॉलॉजी तज्ञ यांचाही समावेश होता. दिल्ली हायकोर्टाचे सबरजिस्ट्रार, रोहित शेखर व त्याची आई हेही हे नमुने घेताना तेथे हजर होते.तिवारी यांच्या घराभोवती कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय खबरदारी घेऊन करण्यात आली असून हे नमुने सील करून प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

एन.डी.तिवारी यांना वास्तविक २७ एप्रिल रोजीच दिल्ली उच्चन्यायालयाने रक्ताचे नमुने देण्याचे आदेश दिले होते मात्र तिवारी यांनी आजपर्यंत ही बाब टाळली होती. या संदर्भात तिवारी यांना न्यायालयाने २५ हजार रूपयांचा दंडही ठोठावला होता.