पॉमर्शबॉशवरील विनयभंगाचा गुन्हा मागे घेतला

नवी दिल्ली दि.२४- आयपीएल स्पर्धेतील बंगळूरच्या रॉयल चॅलेंजर्समधील ऑस्ट्रेलियन खेळाडू ल्यूक पॉमर्शबॉश याच्यावर  अमेरिकन महिलेने दाखल केलेला विनयभंग केल्याचा गुन्हा मागे घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
 
नवी दिल्लीतील हॉटेल मौर्यमध्ये रात्री विजयानिमित्त सुरू असलेल्या पार्टीत ल्यूकने झोहल हमीद या अमेरिकन महिलेचा तिच्या खोलीत जाऊन विनयभंग केला होता आणि त्याला अडविणार्‍या तिच्या मित्रालाही बेदम मारहाण केली होती. झोहलवर तिने पोलिस तक्रार नोंदवू नये म्हणून खूप दबाव टाकला गेला होता मात्र तरीही तिने पोलिस तक्रार नोंदविल्याने ल्यूकला मागच्या शुक्रवारी अटक करून नंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. मात्र ल्यूकने भारत सोडून जाऊ नये असा आदेश न्यायालयाने दिला होता.

 या प्रकारानंतर रॉयल चॅलेंजरचा मालक सिद्धार्थ मल्या याने ट्विटवर झोहल हिच्या चारित्र्यासंबंधी कांही मजकूर लिहिल्याने त्यालाही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतर झोहल हिने मल्या माफी मागण्यास तयार असेल तर ल्यूकविरोधातील तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शविली होती. तशी तडजोड झाल्यानंतरच हा गुन्हा मागे घेण्यात आला असल्याचे झोहल हिच्या वकीलांनी सागितले असून तसा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला जाणार असल्याचेही सांगितले आहे.