पेट्रोलमध्ये साडेसात रूपयांची दरवाढ

नवी दिल्ली, दि. २३ – सत्तास्थापनेची तीन वर्षे साजरी करणार्‍या युपीए सरकारने सर्वसामान्यांना पेट्रोल दरवाढीची भेट दिली आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना सरकारने आणखी एक झटका दिला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या किंमतीत साडेसात रूपयांची भरघोस वाढ होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पेट्रोलमध्ये घसघशीत वाढ होण्याचे संकेत केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिले होते. पेट्रोलचे दर प्रती लिटर ६.२८ रूपयांनी वाढविले असल्याचे तेल कंपन्यांनी सांगितले. या दरात व्हॅट सामील केल्यावर पेट्रोलची एकंदर किंमत साडेसात रूपये प्रति लिटर होणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत ७८.१६ रूपये, दिल्ली ७३.१४ रू., कोलकाता ७७.५३ रू. तर चेन्नई ७७.०५ रू. होईल.

पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे सर्वच गोष्टी महागणार आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी वित्त मंत्रालयाकडे केली होती. परंतु, मंत्रालयाने ही मागणी फेटाळून लावली. यामुळेच पेट्रोलची दरवाढ करणे गरजेचे झाले. तेल कंपन्यांना होत असलेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी दरवाढ लागू करण्यात आली आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शपथविधीच्यावेळी पेट्रोलचा भाव ४० रूपये होता. मात्र, आता तीन वर्षानंतर पेट्रोलचे भाव दुपटीने वाढले असून ८० रूपयांवर येवून ठेपले आहेत. दरम्यान, दरवाढीमुळे विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. सरकारने पेट्रोल दरवाढ मागे घ्यावी असे भाजपने म्हटले आहे.