हवाई दलाच्या अधिकार्‍यास लाखो रूपयांचा गंडा घालणार्‍या आरोपीस अटक

ठाणे, दि. १७ – गोव्यात भागीदारीत हॉटेल चालवण्याचे आमिष दाखवून हवाई दलाच्या निवृत्त अधिकार्‍याला लाखो रूपयांचा गंडा घालणार्‍या भामट्याला कासार वडवली पोलिसांनी अटक केली आहे. राजेश ठक्कर (५०) फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सराफानांही त्याने हातोहात फसवले असून फसवणुकीचा हा आकडा कोटींच्या घरात असल्याची माहिती वरील पोलिस निरीक्षक प्रमोद खाडे यांनी दिली.
    ठाण्यातील कशेळी येथे राहणारे विशाल धारवाडकर या हवाई दलाच्या निवृत्त अधिकार्‍याला ठक्कर याने गोव्यातील पणजी येथे भागीदारीत हॉटेल चालविण्याचे आमीष दाखवून त्यांची २४ लाख ५० हजारांची फसवणूक केली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बुधवारी पहाटे पातलीपाडा येथून त्याला अटक केली. त्याला १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून त्याच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. ठक्कर हा भामटा कधी बडा व्यापारी तर कधी मोठा इस्टेट एजंट असल्याचे भासवून ब्रम्हांडमध्ये बंगला असल्याचे सांगत असे. विविध बतावण्या करून गंडा घालण्यात तरबेज असलेल्या ठक्करने सराफानांही फसवले आहे. सराफी पेढीत मोठ्या खरेदीचा बहाणा करीत नमुन्यादाखल दागिने घेवून अथवा रोख रक्कम घरी विसरलो, धनादेश चालेल का? असे सांगून सराफाचा माणूस सोबत नेवून रफुचक्कर होत असे. या फसवणुकीच्या धंद्यात त्याची पत्नीही त्याला साथ देत असे. अशाप्रकारे त्याने मुंबई, ठाणे, नालासोपारा, वज्रेश्‍वरीसह गोव्यातही अनेकांना गंडा घातल्याची माहिती अखेर समोर येत असून हा आकडा कोटयवधींच्या घरात पोहोचण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.