
ठाणे, दि. १७ – थकीत बिलाची रक्कम देण्यासाठी एका ठेकेदाराकडून दीड लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जव्हार येथील कार्यकारी अभियंता बाळकृष्ण झोडगे (४९) यांना लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी रात्री आठच्या दरम्यान ठाणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात आली.
वाडा येथे वास्तव्य करणारे ठेकेदार सदाशिव जाधव हे रस्त्यांची कामे करतात. २००८-०९ मध्ये केलेल्या कामाची बिले त्यांना मिळत नव्हती. थकीत बिलाबाबत वारंवार आग्रह करीत सदाशिव यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना लेखी निवेदन दिले होते. मात्र, अभियंता झोडगे यांनी बिले काढण्यासाठी ठेकेदार जाधव यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती.
अखेर आरोपी अभियंता बाळकृष्ण झोडगे यांना धडा शिकविण्यासाठी ठेकेदार जाधव यांनी दीड लाखांचा पहिला हप्ता देण्याचे नाटक केले. सदर पैसे स्वीकारताना झोडगे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
