पाकिस्तानी हवाई दलाच्या दोन विमानांची टक्कर,चार वैमानिक ठार

इस्लामाबाद, दि. १७ – पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रशिक्षण देणार्‍या दोन विमानांची हवेत टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत चार वैमानिक ठार झाले. ही दुर्घटना पेशावर पासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या पाकिस्तानी हवाई दल अकादमीच्या परिसरातील रख्ख्याई भागात गुरूवारी सकाळी घडली. या विमानांचे अवशेष नागरी वस्तीवर पडल्याने त्यामध्ये पाच नागरिक जखमी झाले आहेत.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशेरा जिल्हयातील रख्ख्याई परिसरात दोन प्रशिक्षण विमानांची टक्कर झाली. त्यानंतर या विमानांचे अवशेष दोन घरांवर कोसळले. या विमान अपघाताच्या घटनेस पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला असून, हा अपघात कशामुळे झाला याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आठवडयात पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानास अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या ११ मे रोजी पाकिस्तानी हवाई दलाच्या मिराज विमानास अपघात झाला होता.