हवामानाचा अंदाज मिळणार आता एसएमएसवर

पुणे दि.१७- हवेची गुणवत्ता, संबंधित ठिकाणच्या हवेचे तपमान, हवामानाचा दुसर्‍या दिवशीचा अंदाज आता एसएमएस अॅलर्ट, वेब पोर्टल, ईमेल अॅलर्टद्वारे सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहेच पण शहरात जागोजागी लावलेल्या एलइडी,एलसीडी स्क्रीनवरही ही सारी माहिती आता पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. दिल्ली नंतर अशा प्रकारची सेवा मिळणारे पुणे हे दुसरे शहर असून त्यानंतर हा प्रकल्प चेन्नई, कोलकाता आणि मुंबईत राबविला जाणार आहे. सिस्टीम फॉर एअर क्वालिटी फोरकास्टींग अॅन्ड रिसर्च किवा सफर (safar) हा प्रकल्प इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रोपिकल मेटरॉलॉजी, पुणे ने विकसित व कार्यान्वित केला आहे.
  या विषयी अधिक माहिती देताना संस्थेचे संचालक बी.एन. गोस्वामी म्हणाले दिल्ली नंतर पुणे हे देशातले हा प्रकल्प राबविणारे दुसरे शहर आहे. दिल्लीत हा प्रकल्प राष्ट्रकुल स्पर्धांच्यावेळी सुरू करण्यात आला होता. यातून नागरिकांना जी माहिती मिळणार आहे त्यात प्रदूषण पातळी, अतिनील किरणांचे रेडिएशन, दिवसाचे तापमान, हवेची शुद्धता तसेच पुढील दिवसाचा हवामान अंदाज दिला जाणार आहे. १७ मे रोजी या संबंधीची एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली त्यात १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. आता हे विद्यार्थी शहरभर फिरून डेटा गोळा करणार आहेत. त्यात हवेची गुणवत्ता, वाहनांचे प्रदूषण, उद्योग, बांधकाम, झोपडपट्टीमुळे होणारे प्रदूषण यांची माहिती गोळा करतील.
  संस्थेतील वरीष्ठ संशोधक गुरफान बेग या विद्यार्थ्यांचे नेतृत्त्व करणार असून या प्रकल्पासाठी नवी उपकरणे वापरली जाणार आहेत. वाहनांची संख्या, इंधन गुणवत्ता, देखभाल, वाहतूक कोंडी, अरूंद रस्ते, बांधकामे, पेव्हिंग केलेले व न केलेले रस्ते, जुन्या वाहनांतील तंत्रज्ञान, प्रदूषण करणार्‍या ओझोन, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजनची पातळी अशा अनेक बाबींचा यात विचार केला जाणार आहे.
 याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांबरोबरच नियोजन कर्त्यांनाही होणार आहे. सोप्या भाषेत ही माहिती जागोजागी मिळू शकणार आहे. प्रदूषण पातळी कळण्यासाठी रंगांचा वापर केला जाणार आहे तसेच अतिनिल किरणांचे प्रमाण कळल्यामुळे नागरिकांना त्यापासून संरक्षण करून घेता येणार आहे. या किरणांमुळे त्वचा रोग, संसर्ग, त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. या वर्षअखरे हा प्रकल्प कार्यान्वित होत असून त्यासाठी सरकारी संस्था, महानगरपालिका, वसंतदादा शुगर संस्था, पुणे विद्यापीठ, वेधशाळा अशा अनेक संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे.