स्मार्टफोन विक्रीत ६० टक्के भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचा सॅमसंगचा निर्धार

 यंदाच्या वर्षात भारतीय बाजारपेठेत आपला हिस्सा ६० टक्कयांवर नेण्याचा सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा इरादा असल्याचे कंपनीचे भारतातील प्रमुख रणजीत यादव यांनी स्पष्ट केले.
  बाजारपेठेत एकापाठोपाठ एक उत्पादने आणून ती यशस्वी करण्याची परंपरा सॅमसंगने निर्माण केली आहे. भारतीय बाजारपेठेत यंदाच्या वर्षात १८ ते १९ दशलक्ष स्मार्टफोनची विक्री अपेक्षित असून त्यात ६० टक्के वाटा मिळविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच कंपनीने ४५ टक्के वाटा मिळविला आहे असेही यादव यांनी सांगितले.
  भारतात २०१०-११ या सालात ८ दशलक्ष स्मार्टफोनची विक्री झाली होती.हे प्रमाण चालू वर्षात १८ ते १९ दशलक्षांवर जाण्याची चिन्हे आहेत. सॅमसंगने पहिल्या चार महिन्यातच १० नवीन मोबाईल हँडसेट लाँच केले असून त्यात ड्यूएल सीम गॅलॅक्सी वाय, व गॅलॅक्सी प्रॉड्युओस यांचा समावेश आहे. हे स्मार्टफोन साधारणपणे आठ हजार ते अडतीस हजार रूपयांच्या रेंजमधील आहेत. कंपनीची आणखी कांही उत्पादने बाजारात येत असून त्यात गॅलॅक्सी एस थ्री हे मोठे आकर्षण आहे.
  मोबाईल क्षेत्रात भारत हे जगातील मोठ्या मार्केटपैकी एक असून सॅमसंगसाठी जागतिक विक्रीतील मोठा वाटा भारताकडूनच मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच भारतातील विक्री वाढीसाठी भारतीयांची लाईफ स्टाईल समृद्ध करणारी बेस्ट मोबाईल उपकरणे तयार करणे हीच भारताबाबत कंपनीची स्ट्रॅटीजी असल्याचेही यादव यांनी सांगितले.

Leave a Comment