
मैत्रीची व्याख्या शब्दात व्यक्त करता येणे तसं अवघडच! मैत्री म्हणजे एकमेकांचा विश्वास की आश्वासक सहवास…कुणासाठी मैत्री नवचैतन्य देणारी, तर कुणासाठी आयुष्य सावरणारी. मैत्री म्हणजे केवळ अतुट बंधन नसतं, तर त्या असतात रशीमगाठी. मैत्रीच्या अशाच हळुवार नात्यातील चढ-उताराचा प्रवास रेखाटणारा `स्वप्न तुझे नी माझे’ हा चित्रपट मे ला प्रदर्शित होतोय. नामदेव उमाजी सिने आर्टसप्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती सचिन भालिंगे यांनी केली असून संकल्पना त्यांचीच आहे. अशोक कांबळी यांनी `स्वप्न तुझे नी माझे’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ओम साई फिल्म्स निर्मिय स्वप्न तुझे नी माझे ही कथा आहे.
विद्याधर आणि विश्वास या दोन मित्रांमधील अतूट नात्याची, त्यांच्य शुद्ध मैत्रीची. शेतकी महाविद्यालयातील प्रशिक्षणानंतर श्रीमंत घरातील विद्याधरला दुष्काळी भागात नंदनवन फुलवायचे आहे, तर गरीब घरातील विश्वासला गावाचा उद्धार करायचा आहे. पण विश्वासच्या अकस्मात जाण्याने त्याचे स्वप्न अर्धवट राहते. त्यांच्या घरातल्यांना आधार देण्यासाठी आणि मित्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्याधर विश्वासच्या गावी येतो. गाव पातळीवर विद्याधरला कोणत्या संघर्षाला सामोरं जावे लागते ? मित्राचे स्वप्नं पूर्ण करण्यात त्याला यश येतं का ? हे रेखाटणारा चित्रपट म्हणजे…स्वप्न तुझे नी माझे.
या चित्रपटाचे आकर्षण म्हणजे शंकर महादेवन यांचा सुपुत्र सिद्धार्थ महादेवन या मराठी चित्रपटतून संगीतकार आणि गायक म्हणून तर भाचा सौमिल संगीतकार म्हणून पदार्पण करीत आहे. मनोज यादव लिखित या चित्रपटातील पाच गीतांना आजच्या पिढीचे सर्वात युवा संगीतकार सौमिल आणि सिद्धार्थ या जोडीने संगीत दिले आहे.
आजची तरूणाई वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी धडपडते आहे, पण शहरातील तरूण शेतीकडे वळत नाही. आपल्या ज्ञानाचा, आधुनिक तंत्रज्ञांनाचा उपयोग कृषी क्षेत्रात करून देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी करावा, हा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा निर्मात्याचा प्रयत्न आहे. दिग्दर्शक अशोक कांबळी यांनीच पटकथा व संवादही दिले. राजा फडतरे यांनी छायाचित्रण केले असून नृत्यदिग्दर्शन अनिल सुतार यांचे आहे.
