
द डर्टी पिक्चर, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई आणि पानसिंह तोमरच्या यशानंतर आता चर्चित व्यक्तींच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचे नवे फॅड बॉलीवूडमध्ये आले आहे. सध्या नेपाळच्या तुरुंगात बंद असलेल्या चार्ल्स शोभराज या कुख्यात गुन्हेगाराच्या आयुष्यावर चित्रपट बनवला जाणार आहे. ‘जेलब्रेक’ असे नाव असलेल्या या चित्रपटात शोभराजची भूमिका साकारण्यासाठी इम्रान हाश्मी आणि सैफ अली खान यांच्यात चढाओढ लागली आहे. चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत करणार असून दिग्दर्शन प्रवल रमन करणार आहेत. निर्माता-दिग्दर्शकांनी हा चित्रपट शोभराजवर आधारित नसल्याचे म्हटले आहे; पण चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी मात्र चित्रपटातील मुख्य पात्र शोभराजपासून प्रेरित असल्याचे म्हटले आहे. हा एक क्राईम थ्रिलर चित्रपट असून मुख्य भूमिकेसाठी सैफ आणि इमरानच्या नावांवर विचार सुरू आहे; पण दोघेही सध्या व्यस्त असल्याने निर्मात्यांसाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
