
लंडन दि.१५- पुढच्या महिन्यात आपला तिसावा वाढदिवस साजरा करत असलेल्या प्रिन्स विल्सम्सला त्याची आई डायना हिच्या संपत्तीतील ८६ कोटी रूपयांची संपत्ती तिच्या इच्छापत्रानुसार मिळणार असून त्यातून विल्सम्स आणि त्याची पत्नी केट हे स्वतःसाठी स्वतंत्र घर प्रथमच घेऊ शकणार आहेत. २१ जून रोजी विल्सम्सचा वाढदिवस आहे.
प्रिन्सेस डायना हिने केलेल्या इच्छापत्रानुसार विल्सम्स आणि त्याचा धाकटा भाऊ हॅरी यांना तिच्या संपत्तीचा निम्मा निम्मा वाटा मिळणार होता. मात्र हे इच्छापत्र डायनाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी नव्याने करण्यात आले कारण तशा सूचना न्यायालयाकडून देण्यात आल्या होत्या. विल्सम्स त्याचे वडील राजा बनल्यानंतर वारसाहक्कानेच डच ऑफ कार्नवेल होणार आहे. त्यामुळे डायनाची इच्छा अशी होती की विल्सम्सने त्याच्या वाटणीतील कांही रक्कमही हॅरी या धाकट्या भावाला द्यावी.
लेडी डायनाची गुंतवणूक स्टॉक्स, शेअर्स मध्ये आहे. तसेच तिचे दागिने, रोख रक्कम, ड्रेसेस, व अन्य वैयक्तिक वस्तू तिच्या किग्स्टन पॅलेस अपार्टमेंट मध्ये आहेत.१९९३ साली केलेल्या मूळ इच्छापत्रानुसार दोन्ही मुले पंचवीस वर्षांची झाली की त्यांना ही संपत्ती समसमान मिळणार होती. मात्र तिच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी हे इच्छापत्र १९ डिसेंबर १९९७ ला हायकोर्टाच्या निर्णयानुसार बदलण्यात आले. विशेष म्हणजे मृत्यूपत्राचे एक्सिक्युशन करणार्या वकीलांनी ही दोन्ही इच्छापत्रे सार्वजनिक केली.
डायनाचा वधू वेश, कपडे, तिचे चित्र असलेले ट्रेडमार्क, त्याचे कॉपीराईट व त्यातून मिळणारी रॉयल्टी याचा वापर चॅरिटीसाठी करण्यात येणार असल्याचेही समजते.
