
काठमांडू, दि. १४ – नेपाळमध्ये सोमवारी अग्नि एअरच्या एका विमानास झालेल्या अपघातात १५ प्रवासी ठार झाले असून त्यामध्ये १३ भारतीयांचा समावेश आहे. सदर विमान पोखरा येथून जोमसोम या ठिकाणी जात होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी पावणे दहाच्या सुमारास सदर विमान जोमसोम विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला. या विमानातून एकूण २१ जण प्रवास करीत होते. त्यामध्ये तीन चालकवर्गाचा समावेश आहे. अपघातात मरण पावलेले अन्य दोघेजण नेपाळी वैमानिक आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना पोखरा येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तीन भारतीय असून त्यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. तसेच डेन्मार्कचे दोन नागरिक आणि एका नेपाळी हवाई सुंदरीचा जखमींमध्ये समावेश आहे. नेपाळमध्ये पर्यटकांना घेवून जाणार्या छोट्या विमानांना अपघात होण्याचे प्रकार वारंवार घडतच असतात.
अग्नि एअरच्या विमानातून जे भारतीय पर्यटक जोमसोमला जात होते, ते तेथून पुढे मुक्तीनाथ या तीर्थक्षेत्रास जाणार होते. मुक्तीनाथ तीर्थक्षेत्र जोमसोमपासून जवळच असून तेथे हिंदू व बौद्ध यात्रेकरू नेहमीच दर्शनासाठी जात असतात. जोमसोम येथे झालेल्या विमान अपघातासंदर्भात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
