भवानीमातेच्या मंदिरास २ कोटींची चांदीची मूर्ती अर्पण

तुळजापूर, दि. १४ – पुणे येथील देवीभक्त विजय एकनाथ उंडाळे व त्यांचे बंधू नितिन उंडाळे यांच्या वतीने तुळजाभवानी चरणी अंदाजे दोन कोटी रुपये किंमतीची चांदीची मूर्ती व सोन्याचे दागिने रविवारी मोठ्या उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात अर्पण  करण्यात आले. यानिमित्त मंदिर परिसर व देवीचा गाभारा विविध फुलांनी सजविण्यात आला होता.
तुळजाभवानी मंदिरात अर्पण होणारी चांदीची मूर्ती १७० किलोंची आहे तर पावणेदोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने आहेत. या मूर्ती अर्पण सोहळ्याची गेल्या तीन दिवसांपासून तुळजाभवानी मंदिरात तयारी चालू आहे. मंदिराला फुलांनी सुशोभित करण्यासाठी व विद्युत रोषणाई करण्यासाठी पुण्याहून जवळपास १५० च्यावर कारागीर काम करीत आहेत. बाहेरगावच्या यात्रेकरुबरोबरच रविवारी शहरातील हजारो भक्तांनी मंदिरातील सोहळा पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. सायंकाळी ५ च्या सुमारास पुणे येथून आणलेल्या देवीच्या मूर्तीची शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.