पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने चांगली गोष्ट – मुख्यमंत्री

पुणे, दि. १४ – भारतासह जगात सर्वच ठिकाणी आतंकवादी हल्ले सुरु आहेत. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणा खर्ची पडत असल्याने आपल्या देशाचा व्हावा तितका विकास होत नाही, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पाकिस्तानबरोबर परत क्रिकेटचे सामने सुरु होणार आहेत ही चांगली गोष्ट आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले .
सरहद रिसर्च सेंटर फॉर कॉन्फ्लिक्ट रेझल्युशन अॅन्ड पीस आणि चिनार पप्लिशर्सच्या वतीने प्रकाशित होणार्‍या पाकिस्तान विषयक २५ पुस्तकांच्या  प्रकल्पाचा शुभारंभ आणि ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर यांच्या ‘ज्वालाग्राही पाकिस्तान’ या रेखा देशपांडे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकाच्या  प्रकाशनावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी लेखक, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले आदी उपस्थित होते.
आपले पंतप्रधान नेहमी म्हणतात की, आपण आपले मित्र निवडू शकतो परंतु शेजारी निवडू शकत नाही. जगात सर्वच देशात आतंकवादी हल्ले होत आहेत. याचा मुकाबला करण्यासाठी आपल्या देशातील आर्थिक ताकद, अनेक यंत्रणा अडकून पडल्या आहेत. त्यामुळे याचा आपल्या विकासाला अडथळा निर्माण होत आहे. आपण भारताशी समोरासमोर युध्द करु शकत नाही हे पाकिस्तानला कळले आहे. त्यामुळे त्यांनी आपली रणनिती बदलली आहे.
केंद्रातील गुप्तचर यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, दोन देशातील दरी कमी करण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी संवाद वाढविण्याची गरज आहे. यासाठी त्यांच्याबरोबर व्यापार, उद्योग आणि गुंतवणूक वाढवली पाहिजे. काश्मीरमधील परिस्थिती गेल्या दोन दिवसांपासून सुधारत असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment