
वॉशिंग्टन, दि.११ – ’अल काईदा’ या संघटनेचे जगातून संपूर्णपणे उच्चाटन करण्याचा अमेरिकेचा निर्धार आहे, असे संरक्षणमंत्री लिऑन पॅनेटा यांनी म्हटले आहे. ’अल काईदा’चे सदस्य जगाच्या कोणत्याही कानाकोपर्यात असले तरी अमेरिका त्यांना सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अलीकडेच अमेरिकेकडे निघालेल्या एका विमानावर ८ मे रोजी हल्ला करण्याचा असफल प्रयत्न ’अल काईदा’ने केल्याच्या घटनेनंतर अमेरिकेने हे भाष्य केले आहे.
पेंटॅगॉनमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना संरक्षणमंत्री पॅनेटा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात, ’अल काईदा’चे सदस्य जगात कोठेही लपले असले तरी तेथे जावून आम्ही त्यांचे समूळ उच्चाटन करू, असे सांगितले. आपला इशारा येमेनच्या दिशेने आहे का, असे विचारले असता, अमेरिकी सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा ’अल काईदा’च्या मागावर असून त्यांचा आम्ही पिच्छा पुरवीत आहोत, अलीकडेच येमेनमधून अमेरिकी विमाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ती लक्षात घेवून आवश्यक त्या उपाययोजना अमेरिकेकडून केल्या जात आहेत असे पेनेटा म्हणाले.
