राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आता अनुसुचित जमाती सामील

नवी दिल्ली दि.१०- विद्यमान राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर १३ वे राष्ट्रपतीपद अनुसुचित जमातीला मिळण्यासाठीच्या प्रयत्नांनी दिल्लीत जोर पकडला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.  माजी लोकसभा सभापती व राष्ट्रवादीचे नेते पी.ए. संगमा यांनी कांही दिवसांपूर्वी हे पिल्लू सोडले होते. मात्र ती चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. अनुसुचित जमातीच्या कोणत्याही नेत्याचे नांव त्यासाठी अद्याप समोर आणले गेले नसले तरी मेघालयचे राज्यपाल आर.एस.मुशहारी यांच्या नावाला विशेष पसंती मिळत असल्याचेही समजते. मुशहारी हे माजी आयपीएस अधिकारी असून त्यांनी नॅशनल सिक्युरिटी गार्ड तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे महासंचालकपदही भूषविले आहे.
 आयसीआयटीपी (इंडियन कॉन्फेडरेशन ऑफ इंडेजिनस अॅन्ड ट्रायबल )च्या शिष्टमंडळाने या संदर्भात मंगळवारीच काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांची भेट घेतली असून मुशहारी यांच्या नावाचा विचार आपण गंभीरपणे करू असे आश्वासन दिल्याचे संस्थेचे मुख्य सल्लागार जेब्राराम मच्चारी यांनी सांगितले. आयसीआयटीपी खाली ३१० संस्था एकित्रित आहेत.
 लोकसभा आणि राज्यसभा मिळून अनुसुचित जमातीचे ५३ खासदार आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८ टक्के इतके या जमातींची लोकसंख्या आहे मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून राखीव, दलित तसेच अनुसुचित जाती व अल्पसंख्यांकांमधून राष्ट्रपतीपद भूषविले गेले आहे मात्र ही संधी अनुसुचित जमातींना मिळालेली नाही. त्यामुळे आताचा राष्ट्रपती अनुसुचित जमातींमधून निवडला जावा यासाठी ट्रायबल फोरम ऑफ इंडियाच्या सदस्यांनी लोकसभेतील बहुतेक सर्व राजकीय पक्ष नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. बुधवारी पी.ए.संगमा यांनी सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांना व नेत्यांना अनुसुचित जमातीच्या प्रतिनिधीला पाठींबा द्यावा यासाठी आवाहन केले असल्याचे माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते अरविद नेताम यांनी सांगितले. नेताम या फोरमचे प्रमुखही आहेत. अनुसुचित जमाती तसेच जातींच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठींबा देण्याचे वचन दिले असल्याचे सांगून ते म्हणाले की भाजपच्या सुषमा स्वराज, अरूण जेटली तसेच समाजवादीचे मुलायमसिंगग, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, सोनिया गांधी, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशीही चर्चा सुरू असून त्याच्याकडून अजून कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही.
   अनुसुचित जमातींमधील राष्ट्रपतीपदासाठी जी यादी सादर करण्याची तयारी सुरू आहे त्यात पी.ए.संगमा यांच्याही नांवाचा समावेश असल्याचेही अंतर्गत सूत्रांकडून समजले.