कमी होत चाललीय सोन्याची झळाळी

नवी दिल्ली/मुंबई दि.१०-भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असला आणि ग्राहकांकडून सोन्याला मागणीही चांगली असली तरी जागतिक बाजारपेठेतच सोन्याचे भाव घसरू लागल्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार दिवसात सोन्याचांदीचे भाव सातत्याने कमी होत असून तीन आठवड्यातील सर्वात कमी भावाची नोंद आज करण्यात आली.आज सोन्याचे भाव दहा ग्रॅमला २८८४० रूपयांवर घसरले. पाच मे रोजी हेच दर १० ग्रॅमला २९७५० रूपयांवर होते. मुंबई बाजारात आज सोन्याचा भाव दहा ग्रॅमला २८५१० रूपयांवर आला. म्हणजे गेल्या चार दिवसांत सोन्याचे भाव तब्बल ९१० रूपयांनी उतरले आहेत.
   जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरण्यास मुख्य कारण ठरले ते फ्रान्समधील राजकीय घडामोडी आणि ग्रीसमधील घडामोडी. या दोन्ही देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे युरोच्या तुलनेत डॉलरची मागणी वाढली व परिणामी गुंतवणूकदार सोन्याकडून डॉलरकडे वळल्याचे अर्थतज्ञांचे मत आहे.
   भविष्यातील बाजारासाठीही हाच ट्रेंड अनुभवास येत असून जूनमध्ये डिलिव्हरी करण्यात येणार्‍या सोन्याचा दरही १० ग्रॅमला २८४९२ रूपये ठरविला गेला आहे. परिस्थिती हीच राहिली तर सोन्याचे दर आणखीही उतरतील असा अंदाज अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. डॉलर आणि रूपया यांचे विनियमाचे दर कसे राहतील त्यावर पुढील घसरण अवलंबून असेल असेही मत व्यक्त होत असून कदाचित सोन्याचे दर १० ग्रॅमला २८ हजारांवर येतील असाही अंदाज जेआरजी वेल्थचे उपाध्यक्ष व संशोधन प्रमुख हरिश गलीपेल्ली यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment