द्रोन हल्ल्यात पाकिस्तानात दहा जण ठार

इस्लामाबाद दि.५- अमेरिकेने पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमाभागात केलेल्या द्रोन हल्लयात १० दहशतवादी ठार झाले असल्याचे वृत्त आहे.
  पाकिस्तानी सुरक्षा अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर वझिरीस्तानातील मिरनशाहपासून ७० किमी अंतरावरील शॉवेल भागात दहशतवादी लपल्याचा संशय आल्याने अमेरिकेने द्रोन मधून दोन मिसाईल्स डागली. त्यात मातीची भिंत पूर्ण नष्ट होऊन दहा जणांचा मृत्यू झाला.वझिरीस्तान हा आदिवासी भाग असून येथे तालिबानी तसेच अलकायदाचा मोठा अड्डा आहे. येथे प्रशिक्षण केंद्रेही चालविली जातात. अल कायदाचा पूरा नायनाट करण्याचे अमेरिकेचे धोरण असल्याने हा द्रोन हल्ला करण्यात आला. मृतांची ओळख पटलेली नाही.
   मार्च महिन्यातच पाकिस्तानी संसदेने अमेरिकेशी संबंधाबाबत कांही नवी धोरणे ठरविली आहेत. त्यात पाकिस्तानच्या भूभागावर द्रोन हल्ले बंद करावेत कारण त्यात पाकिस्तानी नागरिकांनाही प्राणास मुकावे लागते आहे तसेच त्यामुळे अमेरिका विरोधातील भावना  वाढीस लागते आहे असे कारण देतानाच अमेरिकेचे पाकिस्तानी भूमीवर हल्ले हे पाकिस्तानच्या सार्वभौमत्त्वावरीलच हल्ले आहेत असेही ममूद करण्यात आले आहे. त्यानंतर अमेरिकेचा हा दुसरा द्रोन हल्ला आहे.
 गतवर्षी पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने खात्मा केल्यानंतर तसेच अमेरिकेच्या एअर रेडमध्ये २४ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध बिघडले होते ते पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जानेवारीत पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानी भूमीवर दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी द्रोन हल्ले केले जात असल्याची कबुली दिली होती. ओबामा सत्तेवर आल्यानंतर २००९ मध्ये पाकिस्तानात ४५ द्रोन हल्ले करण्यात आले तर २०१० मध्ये ही संख्या १०१ वर गेली होती.२०११ मध्ये ती पुन्हा ६४ वर आली असल्याचे व या हल्य्यात गेल्या आठ वर्षात अडीच हजार जणांचा बळी गेला असल्याचे सांगण्यात आले आहे.