
बिजिग दि.४- चीनमध्ये आता इलेक्ट्रॉनिक्स चीप बसविलेले नवे पासपोर्ट नागरिकांना दिले जाणार असून या चीपमध्ये नागरिकाची वैयक्तिक माहिती, बोटांचे ठसे, जन्मतारीख साठविलेली असेल.फेरफार करणे अशक्य असलेले हे पासपोर्ट देण्यामागे चीनी नागरिकांना परदेशात प्रवेश करतानाही सुरक्षा मिळावी तसेच देशातही नागरिकांचा योग्य सन्मान राखला जावा असा उद्देश असल्याचे मिनिस्ट्री ऑफ पब्लिक सिक्युरिटीतर्फे सांगण्यात आले आहे.
जगभरातील ९० देशांत असे पासपोर्ट वापरले जात आहेत. चीननेही त्यासाठी तीन वर्षांपासून तयारी चालविली असून येत्या १५ मे पासून हे नवे पासपोर्ट दिले जाणार आहेत. चायनीज पासपोर्टची सुरक्षा बळकट असावी असाही त्यामागे हेतू आहे. या पासपोर्टसाठी विशेष प्रिटींग शाई, लेझर खुणा, होलिग्राफिक फिल्म आणि डिजिटल सही अशी सुरक्षा असून यातील चीपवर असलेले बोटांचे ठसे फक्त डिकोडिंग उपकरणाच्यांच सहाय्याने पाहता येणार आहेत असे चीन बॉर्डर कंट्रोल अॅथॉरिटीने स्पष्ट केले आहे.
पासपोर्ट मिळविण्यासाठी पूर्वीप्रमाणेच अर्ज करावा लागणार असून १६ वर्षांवरील नागरिकांना बोटांचे ठसे व सही द्यावी लागणार आहे. १६ वर्षांखालील मुलांसाठी पालकांच्या संमतीने ठसे घेतले जाणार आहेत. हे पासपोर्ट पूर्वीच्या पासपोर्टप्रमाणेच असतील फक्त त्यात इलेक्ट्रॉनिक्स चीप बसविली जाणार आहे. चीनमध्ये पासपोर्ट काढणार्यांची संख्या एका वर्षात वीस टक्कयाने वाढली असल्याचेही सांगण्यात आले.
