नवीन गॅलॅक्सी एस थ्री स्मार्टफोनची बाजारात धूम

नवी दिल्ली दि.४- लंडनच्या बाजारात गुरूवारी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा नव्या श्रेणीतील गॅलॅक्सी एसथ्री स्मार्टफोन सादर झाला असून मोठा टच स्क्रीन व पॉवरफुल प्रोसेसर अशी वैशिष्ठ्ये असलेल्या या फोनने सध्या तरी प्रतिस्पर्धी अॅपलच्या आयफोनला विक्रीत मागे टाकल्याचे दिसून येत आहे.
 सॅमसंग या द.कोरियन उत्पादन कंपनीने सर्वात मोठे सेलफोन उत्पादक म्हणून नोकियाचे स्थान नुकतेच हिसकावून घेतलेआहे. आता गॅलॅक्सी बाजारात उतरवून ते सर्वात मोठे विक्रेते म्हणूनही बाजारात स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. गॅलॅक्सी एसथ्री हे मॉडेल मे महिन्यात जगातील कांही देशात उपलब्ध होत असून जूनपासून ते जगात सर्व देशात उपलब्ध होणार आहे.
 गेल्याच आठवड्यात पहिल्या तिमाहीत ५.२ बिलियन डॉलर्स फायदा मिळवून सॅमसंगने बाजारात आघाडी घेतली असून त्यात गॅलॅक्सी एस थ्रीमुळे अधिक भर पडेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीने ४५ दशलक्ष स्मार्टफोन उत्पादित केले आहेत. नवीन गॅलॅक्सी एसथ्री मध्ये ४.८ इंचाचा टच स्क्रीन आणि ८ मेगापिक्सल कॅमेरा असून गुगलच्या अँड्राईड सॉफ्टवेअरचा वापर त्यात करण्यात आला आहे.लंडन ऑलिपिक्सच्या पार्श्वभूमीवर याची विक्री अधिक तडाखेबंद होईल असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी आयएसडी अॅनलिस्ट फ्रान्सिस्को जेरोनिमो यांच्यामते मात्र हा फोन ग्राहकांना खेचून घेण्याइतका आकर्षक नाही.
   सॅमसंगचे उत्पादन स्ट्रेटेजी प्रमुख वॉन हाँग यांना मात्र एसथ्रीची विक्री एसटूपेक्षा किमान २० दशलक्ष युनिटने अधिक असेल असा विश्वास वाटतो आहे.

Leave a Comment