बॉशकडून नाशिकच्या प्रकल्पात ३०० कोटींची गुंतवणूक

नाशिक, दि. ३ – बॉश लिमिटेड नाशिकच्या प्रकल्पात २०१२-१३ या आर्थिक वर्षात ३०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा कंपनीचे येथील प्रकल्पाचे उपाध्यक्ष (वाणिज्य) गोपीकुमार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. या गुंतवणुकीद्वारे सध्याची उत्पादन क्षमता दुपटीने वाढणार आहे. या प्रकल्पात क्लासीकल सीरीज नोझल, युरो सीरीज नोझल व फ्युचर इंजेक्टरचे उत्पादन केले जाते.
    २००७ मध्ये कॉमन रेल इंजेक्टरच्या प्रकल्पात उद्योग समुहाने मोठी गुंतवणूक केली होती. वाहन उत्पादन क्षेत्रातील सर्वच उद्योगांकडून मागणीत प्रचंड वाढ होत असल्याचे लक्षात घेवून प्रकल्पाची उत्पादन क्षमता दुपटीने वाढविली जाणार आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत १०० एकरच्या परिसरात बॉशचा हा प्रकल्प असून, नव्या प्रकल्पाकरीता ३५ हजार चौरस मीटरचे बांधकाम केले. या नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास ४०० जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. गेल्या पाच वर्षात कंपनीने तब्बल पाच लाख इंजेक्टरचे उत्पादन केले आहे. इंजेक्टरची मागणी मोठया प्रमाणात वाढत असल्याने यंदाच्या वर्षी ३०० कोटींची गुंतवणूक करून उत्पादन क्षमता वाढविली जाणार असल्याची माहिती गोपीकुमार यांनी दिली.