आर्थर यांच्याकडून पॉटिंगची पाठराखण

मेलबॉर्न, दि. ३ – गेल्या काही काळात फलंदाजीतील सातत्य राखण्यात अपयशी ठरलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान रिकी पॉटिंग निवृत्ती घेईल असे चित्र आहे. मात्र आगामी ऍशेस मालिकेमध्ये रिकीचा अनुभव ऑस्ट्रलियन संघासाठी तारक ठरेल, असा विश्‍वास ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी व्यक्त करीत पॉटिंगची पाठराखण केली आहे.
    नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज दौर्‍यातील पॉटिंगचे अपयश प्रसारमाध्यमांनी ठळकपणे अधोरेखित केले होते. काही वृत्तपत्रांनी तर त्याच्या निवृत्तीबाबतही चर्चा सुरू केली आहे. पण आजच्या घडीला तो ऑस्ट्रेलियन संघातील प्रमुख खेळाडू असून, पुढील वर्षी होणार्‍या ऍशेस मालिकेत त्याच्या अनुभवाचा आमच्या संघाला उपयोग होईल, असे आर्थर यांनी स्पष्ट केले. पॉटिंगला गेल्या फेब्रुवारीमध्ये भारताविरूद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रलियन संघातून डच्चू देण्यात आला होता.
    कांगारुंना नोव्हेंबरमध्ये साऊथ आफ्रिकेशी दोन हात करावयाचे आहेत तोपर्यंत पॉटिंगकडे खेळण्यासाठी मॅच नाहीत फक्त तो कौंटी सामने खेळु शकतो.
    तीन वेळा विश्‍वचषक विजेत्या आस्ट्रलियन संघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या पॉटिंगने त्याच्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत १६५ कसोटी सामन्यांत ५२.७५ च्या सरासरीने १३,३४६ धावा केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक धावा करणार्‍यांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र वेस्ट इंडिज विरूद्ध झालेल्या ३ कसोटीतील सहा डावांमध्ये त्याला २४.३३ च्या सरासरीने केवळ १४६ धावा करता आल्यामुळे तो आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आपल्या क्रिकेट कारकिर्दीला विराम देईल, असे बोलले जाते.

Leave a Comment