
नवी दिल्ली, दि. २ – भारतीय सैन्य दलासाठी निकृष्ट दर्जाचे ट्रक खरेदीसाठी सेनादल प्रमुख जन. व्ही. के. सिंह यांना १४ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी. बी. आय.) मंगळवारी, प्रथमच यातील प्रमुख संशयित निवृत्त लेफ्ट. जन. तेजिंदर सिंह यांची सुमारे चार तास चौकशी केली.
लेफ्ट. जन. तेजिंदर सिंह बुधवारी सकाळीच सी. बी. आय. मुख्यालयात दाखल झाले आणि चौकशी पथकाने लागलीच त्यांच्याकडे चौकशी सुरु केली. भारतीय सैन्यदलासाठी टेट्रा- ट्रक खरेदी प्रकरणात आजवर झालेल्या चौकशीतून, सैन्यातील अनेक वरिष्ठ अधिकार्यांचा हात असल्यानेच उघडकीस आले आहे. त्यामुळे तेजिंदर सिंह यांच्या चौकशीस महत्व आहे. या शिवाय जन. व्ही. के. सिंह यांनीच त्यांच्यावर थेट आरोप केला आहे. या ट्रक्सच्या खरेदीसाठी २०१० मध्येच लेफ्ट. जन. तेजिंदर सिंह यांनी आपली भेट घेऊन आपल्याला १४ कोटी रुपयांची लाच देऊ केली होती असे जन. व्ही. के सिंह यांनी म्हटले आहे.
अर्थात लेफ्ट. जन. तेजिंदर सिंह यांनी या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. शिवाय सैन्यदल प्रमुखाविरुद्ध् अब्रुनुकसानीचा खटलाही भरला आहे.
