माजी पोलीस निरीक्षक आंधळकर यांना ७ मे पर्यंत पोलीस कोठडी

पुणे, दि. ३ – बेहिशोबी मालमत्ता जमविलेले माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर (५७) यांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले. त्यांनी पोलीस खात्यातील सेवा उत्पनाच्या सुमारे ९६ टक्के बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, आंधळकरांना गुरूवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाने ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे काही दिवसांपूर्वी आंधळकरांनी बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याची निनावी तक्रार आली होती. त्यानुसार पोलिस महासंचालक सुब्रमण्यम यांनी पुणे शाखेला आंधळकरांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आंधळकर यांनी १९७७ पासून २०१० पर्यंत तब्बल ३३ वर्ष पोलीस खात्यात काम केले आहे. ते ७७ मध्ये शिपाई म्हणून पोलीस खात्यात दाखल झाले आणि निवृत्तीच्या वेळी ते पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. या संपूर्ण कार्यकाळातील एकूण उत्पन्नाच्या व्यस्त प्रमाणात त्यांच्याकडे तब्बल एक कोटी ५७ लाख ९६ हजार २४७ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे चौकशी दरम्यान उघड झाले आहे. हे प्रमाण त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे ९५.८० टक्के ज्यादा आहे.
    आंधळकरांना गुरूवारी अतिरिक्त सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. यावेळी सन २००९ मध्ये शहरातील पोलीस अधीक्षकांनी आंधळकरांच्या १९७७-२००९ पर्यंतच्या सर्व संपत्तीचा अहवाल पोलीस आयुक्तालयाला पाठवला होता. तेव्हा यामध्ये कोणतीही बेहिशोबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले नव्हते. मात्र, यावर्षी पुन्हा नव्याने ७७ ते २०१० पर्यंतच्या मालमत्तेच्या कारवाईचे आदेश देण्यात आले. ही संपत्ती कोठून आली त्याबद्दल आंधळकरांनी माहिती न दिल्यास आरोपपत्र दाखल करावे. मात्र, पोलीस कोठडी नको, असा युक्तीवाद आंधळकर यांचे वकील ऍड.सुधीर शहा यांनी केला. पण न्यायाधीश ए.पी.कुर्‍हेकर यांनी आंधळकर यांना ७ मे पर्यंत  पोलीस कोठडी सुनावली.
    दरम्यान, आंधळकर यांनी नोव्हेंबर २०११ रोजी ग्रामीण पोलीस निरिक्षक, पुणे येथे कार्यरत असताना सेवेचा राजीनामा दिला होता. तसेच माहिती अधिकार कायदा चळवळीतील कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणी त्यांची पॉलीग्राफ चाचणी करण्याचे आदेशही सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपअधिक्षक हेमंत भट करीत आहेत.
राजकीय दबावातून कारवाई- आंधळकर
आपण नुकतीच राजकीय वाटचालीला सुरूवात केली असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक शरद रामराव ठोंगे-पाटील हे आपल्या राजकीय विरोधकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे राजकीय हितसंबंध साधण्यासाठी सूड भावनेतून ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप करीत या अनुषंगानेही तपास करण्यात यावा, अशी मागणी आंधळकर यांनी न्यायालयाकडे केली.