
नाशिक, दि. २८ – छत्रपती शिवाजी स्मारक आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रलंबित प्रश्नांवरून २४ मे रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कर्हाडच्या निवासस्थानासमोर उपोषण करण्याचा इशारा मराठा महांसघाने दिला आहे. याबाबतची माहिती संघाचे अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मराठा समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना आरक्षण मिळावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी मराठा महासंघाचे पदाधिकारी राज्याचा दौरा करत आहेत. या निमित्ताने शुक्रवारी ते नाशिकमध्ये आले होते. यावेळी ऍड. पवार यांनी मराठा आरक्षण व छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक या प्रलंबित विषयाबाबत निर्णय घेण्यास शासन दिरंगाई करीत असल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद केले. मराठा आरक्षणाच्या विषयावरून विविध संघटनांच्या सहकार्याने समितीचे गठन करण्यात आले होते. परंतु आमदार विनायक मेटे यांनी ऐनवेळी या विषयातून माघार घेतली आणि समितीचे कामकाज थंडावले.
शिवछत्रपती स्मारकाबाबत शासन ठोस भूमिका घेत नाही. या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेट देण्याचे टाळले. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने मुख्यमंत्र्याच्या कर्हाड येथील निवासस्थानी लाक्षणिक उपोषण केले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. या आंदोलनानंतरही योग्य कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संघाने दिला आहे.
