
पुणे, दि. २९ – समाजातील दुर्लक्षित घटकांना केवळ मदत केली की समाजकार्य झाले असे न मानता त्या मंडळींना आत्मविश्वासाने जगता आले पाहिजे व प्रगती साधता आली पाहिजे, अशी आपल्या सेवा कार्याची दिशा हवी, असे रा.स्व.संघाचे सरकार्यवाह श्री. भय्याजी जोशी यांनी आज संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या सेवासंगम कार्यक्रमाच्या दोन दिवसीय अभ्यास वर्गाचा समारोप करताना सांगितले.
या प्रसंगी संघाचे क्षेत्रीय संघचालक डॉ. अशोकराव कुकडे, प्रांताचे संघचालक प्रा. कचेश्वर सहाने, महानगर संघचालक श्री. बापू घाटपांडे उपस्थित होते. प्रारंभी सेवासंगमचे संयोजक श्री. अनिलजी व्यास यांनी सर्वांचे स्वागत केले. गेले दोन दिवस सुरु असलेल्या या सेवासंगम कार्यक्रमात नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांतील साडेतीनशे कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील समाजसेवी संस्थांनी आपापल्या कामाचे प्रदर्शनही लावले होते.
श्री. भैय्याजी जोशी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षात पाश्चात्य जगातून `चॅरिटी’ हा शब्द पुढे आला आहे. त्या शब्दाचा वापर झाला की, ख्रिश्चन मिशनर्यांचे कामाची पद्धती पुढे येते. आमच्या कामात चॅरिटी म्हणजे आम्ही कोणीतरी त्या पीडितावर उपकार करतो आहोत, अशा भावनेने काम करत नाही. तर त्यांचा सर्वागीण विकास आपल्याला करता आला पाहिजे आणि त्यांच्यात व आपल्यात फरक राहता कामा नये, अशी भावना असते. दुसरे असे की, सेवा कार्याची व्याप्ती वाढता कामा नये कारण आपण दुसर्याला मदत करतो आहोत, हा प्रकार लवकरात लवकर संपला पाहिजे. ‘परोपकाराय पुण्याय’ अशीच संतांची भावना कोणत्याही सेवा कार्यामागे असायची. तीच भूमिका संघाची व संघाच्या माध्यमातून सुरु झालेल्या कामाची आहे.
ब्रिटिशांनी येथे १८६० साली अशा सेवा संस्था कशा असाव्यात, याबाबत एक कायदा आणला. या कायद्याची व्याप्तीच मुळी संस्था जीवनात गुन्हेगारी फोफावू नये, येवढ्या पुरती मर्यादित होती. पैशाचा वापर नीट व्हावा, असे त्याचे उद्दिष्ट होते. आमचा अनुभव असा की, सेवेचे काम मनापासून करायचे ठरविले तर ते पैशापासून अडत नाही आणि त्यासाठी स्वतंत्र संस्थाही लागत नाही. अलिकडे अशा कामाला एन. जी. ओ. नावाच्या संस्था काढण्याचा जो प्रकार पुढे आला आहे त्यातून फारसे सेवा कार्य झाल्याचे दिसत नाही.
आपल्या समाजात आज पस्तीस टक्के लोक अर्थिक मागास यादीत मोडतात. त्यांच्यासाठी त्यांना आत्मविश्वास देणे हे महत्वाचे काम आहे ते आपल्या अनेक संस्था करत असतात.
आपल्या काही कार्यकर्त्यांनी मंदिरापुढे भीक मागणार्यांच्या मुलासाठी एक उपक्रम चालविला त्याचा परिणाम त्या मुलांना तर झालाच; पण त्यांच्या पालकांनीही ‘आमच्या योग्य काही काम द्या ’ असे सांगितले. ही खरी त्या कामाच्या यशाची पोहोच आहे.
आजच्या सत्रात सकाळी अभय माटे आणि मुरलीधर कचरे यांनी संस्थाचे हिशोब कसे ठेवावेत, देणग्या घेताना कोणती काळची घ्यावी, कर आकारणीची योग्य पद्धती कोणती, नोंदणी कशी करावी, शेड्युल एकचे प्रमाणपत्र कसे मिळवावे याबाबत मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात सर्व संस्थांनी आपापले अनुभव सांगितले.
