राष्ट्रपतींनी जागा परत केली

पुणे दि.२७- राष्ट्रपती प्रतिभापाटील याना निवृत्ती नंतरच्या निवासासाठी संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेली खडकीयेथील दोन लक्ष बेचाळीस हजार चौरस फूट जागा त्यांनी परत केल्याने पुण्यातील निवृत्त सेनाधिकारी मंडळींनी आनंद व्यक्त केला आहे. निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी माहितीच्या आधिकारात ही माहिती मिळवली होती व सामान्य सैनिकाला निवासाला प्रत्येक ठिकाणी जागेची अडचण येत असताना राष्ट्रपतींना  मात्र येवढी जागा दिली जाते याबाबत त्यांनी गेले वर्षभर आंदलन सुरु ठेवले होते.

राष्ट्रपती कार्यालयाकडून वरील जागेचे कागदपत्र पंतप्रधान कार्यालयाला परत दिल्याचे वृत्त आज दुपारी पुण्यात मिळाले. माजी राष्ट्रपतींना सहा हजार चौरस फूट जागा देण्याची तरतूद असताना दोन लाख बेचाळीस हजार चौरस फूट जागा काय देण्यात आली असा प्रश्न येथील निवृत्त सैनिक संघटनेने उपस्थित केला होता.