इलेक्ट्रॉनिक मीटर नसल्यास परवाना नूतनीकरण नाही परिवहन खात्याच्या आरटीओला सूचना

पुणे, दि. २५ – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभरातील जुन्या रिक्षांना येत्या एक मेपासून इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येणार आहेत. पुण्यातील सुमारे दीड हजार रिक्षांना पुढील महिन्यात इलेक्ट्रॉनिक मीटर बसवावे लागणार आहेत. इलेक्ट्रॉनिक मीटरशिवाय रिक्षांच्या परवान्याचे नूतनीकरण होणार नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
    प्रवाशांची लुबाडणूक रोखण्यासाठी राज्यातील सर्वच रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन खात्याने घेतला. नव्या रिक्षांना १ मार्चपासून हा निर्णय लागू झाला. जुन्या रिक्षांना सरसकट इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती लागू केल्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परवाना नूतनीकरणाच्या वेळी ही सक्ती लागू होणार आहे. मे महिन्यात शहरातील सुमारे दीड हजार रिक्षांच्या परवान्याचे नूतनीकरण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील महिन्यात या रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसणार आहेत. यापुढील काळात इलेक्ट्रॉनिक मीटर नसलेल्या रिक्षांच्या परवान्याचे नूतनीकरण न करण्याच्या सूचना परिवहन खात्याने आरटीओला दिल्या आहेत.
    केवळ इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या नव्या रिक्षांची आता नोंदणी केली जाते. दर पाच वर्षांनी रिक्षाच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाते. त्यामुळे काही काळातच शहरातील सर्वच रिक्षा इलेक्ट्रॉनिक मीटरवर धावतील.