
पुणे, दि. २२ – प्रेम प्रकरणाला घरच्यांचा विरोध असल्यामुळे स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून एका अल्पवयीन मुलाने शनिवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा शनिवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोज सुमाद जाधव (वय- १६, रा. पाटीलनगर, चिखली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
मनोज आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. मनोजच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. आई व दोन भावांसमवेत तो राहत होता. मनोजचे एका मुलीशी गेल्या दोन वर्षापासून प्रेमप्रकरण सुरु आहे. या प्रेमप्रकरणाची कुणकुण संबधित मुलीच्या आणि मनोजच्या कुटुंबियांना लागली. यावरून घरात वाद होत होते. गेल्या दोन्ही दिवसांपासून दोन्ही कुटुंबियांमध्ये या प्रकरणाबाबत चर्चा सुरु होती. दोन्हीही कुटुंबांकडून प्रेमाला विरोध होत असल्याचे पाहून चिडलेल्या मनोजने शनिवारी सकाळी राहत्या घरी त्याच्या भावाच्या रिव्हॉल्व्हरच्या सहाय्याने स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून घेतल्या. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. जखमी अवस्थेत त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टर त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत.
