बॅंकींग आणि विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात मोठा वाव – मुख्यमंत्री

बॅंकींग आणि विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात मोठा वाव असून यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

वांद्रे येथील हॉटेल ताज लॅंड्स एंड येथे मंगळवारी द.आफ्रिकेतील फर्स्ट रॅंड बॅंकेच्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी द.आफ्रिकेचे वित्त मंत्री प्रविण गॉर्डन, दक्षिण आफ्रिकेचे कौन्सुलेट जनरल श्री.पुली, फर्स्ट रॅंड बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सना, खासदार दिनेश त्रिवेदी, सुरेश प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते. 

संगणक, इंटरनेट, मोबाईल आदी विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान करण्याबरोबरच ‘आधार’ युआयडी क्रमांकाच्या सहाय्याने शासकीय योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यातील अडचणी दूर केल्या जातील, असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, भारत आणि द.आफ्रिकेच्या संबंधांना अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. महात्मा गांधींचा द.आफ्रिकेतील लढा महत्त्वपूर्ण होता. दोन देशातील संबंध वृद्धींगत झाले असून हे संबंध कायम सौहार्दपूर्ण राहिले आहेत. 

भारताचा आर्थिक विकास वेगाने होत असून इथे विविध क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. आर्थिक विकासात महाराष्ट्र कायम आघाडीवर असून उद्योग क्षेत्रातीलही हे आघाडीचे राज्य आहे. यापुढे उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासन औद्योगिक धोरण आखत असून ते लवकरच जाहीर केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.