अकोला, दि. १८ – जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागांतर्गत शासन मान्यताप्राप्त असलेल्या `मिटकॉन’ संस्थेमार्फत संगणक, बेकरी व सौंदर्य प्रशिक्षणामध्ये तब्बल ६० लाखांचा अपहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सेवकराम ताथोड यांनी झालेल्या स्थायी समिती सभेत केला. या संपूर्ण प्रक्रीयेत अधिकार्यांनी पदाधिकार्यांना डावलल्याने जि. प.च्या अध्यक्षा पुष्पाताई इंगळे यांनी संपूर्ण प्रक्रीयाच रद्द करण्याचे आदेश दिले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत `मिटकॉन’ या संस्थेमार्फत तालुका निहाय बेकरी, संगणक व सौंदर्य या प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये अनेक बोगस लाभार्थ्यांचा भरणा करण्यात आलेला असून, नियमबाह्य पद्धतीने हे प्रशिक्षण राबविण्यात आले. कोणत्याही सदस्यांना व विशेष करुन महिला बाल कल्याण सभापती आशाताई घाटोळ यांना तसेच जि. प. अध्यक्षा पुष्पताई इंगळे यांनाही या प्रकरणाची माहिती नसल्याचे समोर आले आहे. हे संपूर्ण प्रशिक्षण मॅनेज केले असून काही लाख रुपयांचे देयकेसुद्धा काढण्यात आल्याने संबंधित अधिकार्याकडून त्याची वसूली करण्याची मागणी विरोधी पक्षनेते सेवकराम ताथोड यांनी केली. एकाच गावातील ४१२ लाभार्थी दाखवून पदाधिकार्यांच्या डोळ्यात महिला व बालकल्याणच्या अधिकार्यांनी धूळफेक केली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, त्यांनी व सदर प्रशिक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी देखील ताथोड यांनी या गंभीर प्रकरणाच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्याचे जि. प. अध्यक्षा पुष्पाताई इंगळे यांनी सांगून अनेक विद्यार्थ्यांचे बनावट स्वाक्षर्या घेऊन प्रशिक्षण कार्यक्रम कागदोपत्रीच राबविण्यात आल्याने ही प्रक्रीया रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिले. तर अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण तर दूरच संगणक काय आहे, हे ही सुद्धा माहिती नाही. दरम्यान, गटनेते प्रदीप देशमुख यांनी खारपाण पट्ट्यांमध्ये पाणीटंचाई भीषण जाणवत असून कोसोदूर ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. तसेच जनावरांच्याही पिण्याच्य पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे प्रशासनाने त्या- त्या गावामध्ये टँकरमध्ये त्वरित पाणी पुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली.
