
मुंबई, दि. १८ – स्वस्त धान्याच्या वाहतुकीसाठी राज्य सरकारने ठरवून दिलेला दर परवडत नसल्याने पुण्यासह दहा जिल्ह्यांत ठेकेदारांनी धान्य वाहतुकीस नकार दिल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तरी यासंदर्भात जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
भाजपच्या आमदार शोभा फडणवीस यांनी या संदर्भात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना पुणे, नागपूर, कोल्हापूर, धाराशीव, लातूर, सातारा, सांगली, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतील ठेकेदारांनी वाहतुकीचा दर परवडत नसल्याने दरवाढ देण्याची मागणी केली. परंतु ही दरवाढ मंजूर न झाल्याने त्याची धान्याच्या वाहतुकीस नकार दिला. यावर सचिवांना सूचना देण्यात आल्याचे उत्तर देऊन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी केला.
परंतु यावेळी विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते दिवाकर रावते आणि रामदास कदम यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर देशमुख यांनी वाहतूक दरात वाढ करण्याबाबत १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याचे आश्वासनही यावेळी दिले. यावेळी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्था महत्वाची असून त्याकरिता आवश्यक धान्य वाहतूक व्यवस्था कार्यक्षम करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
धान्य वितरणाबाबत निर्णय घेण्याबाबतचे निर्देश सचिवांना देण्यात आल्याचे सांगताच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मंत्री अशी टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचे सभापतींच्या निदर्शनास आणले. तर शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते यांनी सचिव निर्णय घेणार असतील, तर अधिवेशनात मंत्र्यांना सचिवांच्या जागेवर आणि सचिवांना मंत्र्यांच्या जागेवर बसवण्याची आवश्यकता आहे, असा सवाल केला. यावेळी सुरुवातील देशमुख यांनी थातुरमातून उत्तर देऊन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केले.
