पुण्यात मण्णपुरम कंपनीच्या कार्यालयावर दरोडा १८ किलो दागिन्यांसह ६ लाखाची रोकड लंपास

पुणे, दि. १८ – पुण्यातील मण्णपुरम गोल्ड फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून अज्ञात चोरट्यांनी १८ किलो सोने आणि ६ लाखांची रोकड लंपास केली. बुधवारी भवानी पेठेत ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली. भवानी पेठेत मण्णपुरम गोल्डचे कार्यालय आहे. सोने तारण ठेवून या कंपनीकडून कर्ज दिले जाते.
    दिवसभर या कंपनीत मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असतात. मंगळवारी कार्यालयाचे कामकाज झाल्यानंतर कार्यालय बंद करण्यात आले. बुधवारी कार्यालय उघडण्यात आल्यानंतर  चोरी झाल्याचे लक्षात आले.  पोलीसांना याची तातडीने माहिती देण्यात आली. श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र, कुत्र्यांना चोरांचा माग काढता आला नाही.
    दरम्यान, चोरट्यांनी तोडफोड न करता बनावट चावीने तिजोरी उघडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कार्यालयातील कुणी या चोरीत सामील नाही ना, याचा तपास पोलीस करीत आहेत. कार्यालयात असणार्‍या सीसीटीव्ही फुटेजही पोलीसांनी ताब्यात घेतले असून, त्याआधारे चोरांना शोधण्याचे काम सुरु आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या दरोड्यात चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारला आहे. कार्यालयाच्या रखवालीसाठी नेमण्यात आलेल्या चौकीदाराची पोलीसांकडून तपासणी झाली.