अफगाणिस्तानमधील लढाई समाप्त, दहशतवाद्यांचा खात्मा

काबूल, दि. १६ – अफगाणिस्तानमध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सहभागी सर्व तालिबानी दहशतवाद्यांना अफगाणी सुरक्षा रक्षकांनी ठार मारले आहे. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते सिद्दीकी यांनी ही माहिती दिली.
    काबुलमध्ये दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांमधील लढाई संपली आहे आणि हल्ला करण्यात आलेली तीन ठिकाणे रिकामी करण्यात आली आहेत, असे सिद्दीकी यांनी सांगितले. तसेच या हल्ल्यात सामील झालेल्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान याबाबतीत अजून कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही. परंतु २० दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात अफगाणस्तानचे पोलिस कर्मचारी तसेच नागरीक मारले गेले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली आहे.
    याचबरोबर नाटोच्या मदतीने राष्ट्रीय लष्करासोबत अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय पोलिसांनी गेल्या २४ तासांत काबुलसहित अकरा विभिन्न प्रांतात संयुक्तरित्या कारवाई केली. या कारवाईत ४७ दहशतवादी मारले गेले, ३१ जण जखमी झाले तर २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे सिद्दीकी म्हणाले.
    रविवारी करण्यात आलेले हे दहशतवादी हल्ले मुख्यतः नाटोची ठिकाणे आणि दूतावासांना निशाण्यावर ठेवून करण्यात आले होते. दहशतवाद्यांनी राजधानीतील वजीर अकबर खान भागातील काबुल स्टार हॉटेलवर हल्ला केला. काही दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना रोखले. त्याचबरोबर संसदेतील काही खासदारांनी देखील त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.