मेथी, कोथिंबीर पंधरा रुपये गड्डी पालेभाज्यांचे दर कडाडले

पुणे, दि.१५ – वाढत्या उन्हामुळे शेतीला देण्यात येणार्‍या पाण्यात घट झाली असून, परिणामी एकूण प्रकारच्या पालेभाज्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे एकीकडे बाजारात पालेभाज्यांची आवक घटली आहे. तर दुसरीकडे हिरव्या पालेभाज्यांना नागरिकांकडून मोठी मागणी होत असल्याने, पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यातच ग्राहकांकडून मोठी मागणी होत असून, मागणीच्या तुलनेत आवक घटल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.
    काल श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात कोथिंबीरीची एक लाख गड्डी, मेथीच्या ८० हजार गड्डीची बाजारात आवक झाली. घाऊक बाजारात कोथिबीरीस शेकडा ५०० ते १२००, मेथी ५०० ते १०००, मुळा ५०० ते १०००, कांदापात ५०० ते ८००, पालक ५०० ते ६०० रुपये भाव मिळाला. तर किरकोळ बाजारात कोथिबींरीच्या एका गड्डीस १५ रुपये, मेथी १५, मुळा १५, कांदापात १२, पालक १०, अंबाडी १०, चाकवत, करडई आणि चुक्याच्या एका गड्डीला ग्राहकांना ८ रुपये मोजावे लागत आहेत. या आठवड्यात उन्हाच्या कडाक्यात अधिक वाढ झाल्यास आवक आणखी आणखी घटण्याची शक्यता आहे. त्यातच सध्यस्थितीत लग्नाच्या तारखा मोठ्या प्रमाणात असल्याने, पालेभाज्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पालेभाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उन्हाचा कडाका वाढल्याने, विहिरी, कालवे, बोरवेलच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने विविध प्रकारच्या पालेभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटली असून, परिणामी पालेभाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. या दरात आणखी वाढ होण्यांची शक्यता मार्केटयार्डातील व्यापार्‍यांनी व्यक्त केली.