नागपूर, दि.१४ – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मपरिवर्तनाची आठवण असलेल्या श्याम हॉटेलचे स्मारक बनावे, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. या जागेशी अनेकांच्या भावना व श्रद्धा जुळलेल्या आहेत, ही जागा स्मारकासाठी आंबेडकरी जनतेच्या ताब्यात द्यावी, असा प्रस्ताव आम्ही राज्य शासनाला पाठवू. सगळ्या राजकीय पक्षांशी चर्च करून याबाबत एकमत निर्माण करू, असे महापौर अनिल सोले यांनी सांगितले.
आनंद टॉकीज आणि श्याम हॉटेल या एकमेकांच्या शेजारी असलेल्या इमारती. आनंद टॉकीजच्या मालकीवरून वाद झाल्याने त्या जागेचा लिलाव करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला दिले. त्याप्रमाणे पुढील तीन महिन्यांत त्याचा लिलाव होईल. ऐतिहासिक धम्म प्रवेशाच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्याम हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. त्यामुळे तेथे त्यांचे यथोचित स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्ष केली जात आहे.
