
न्यूयॉर्क, दि. १३ – न्यूयॉर्कजवळील येल विद्यापीठात व्याख्यानासाठी शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये आलेल्या शाहरूख खानला न्यूयॉर्क विमानतळावर अडवून तब्बल तीन तास त्याची झडती घेण्यात आली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अमेरिकेने या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
येल विद्यापीठात शिकणार्या मुकेश- नीता अंबानी यांच्या मुलीच्या आमंत्रणावरून शाहरूखने तेथे व्याख्यानाला जायचे ठरविले. त्याप्रमाणे तो अंबानी यांच्या खाजगी विमानातून नीता अंबानी यांच्यासमवेत न्यूयॉर्क मिमानतळावर उतरला. नीता अंबानी व इतर प्रवाशांना त्यांची कागदपत्रे पाहून लगेच विमानतळाबाहेर सोडण्यात आले. तथापि शाहरूखला मात्र तेथेच थांबवून त्याची चौकशी करण्यात आली. या प्रकारामुळे वैतागलेल्या शाहरूखने आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना आपल्याला विमानतळावर अटकेत ठेवले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
येल विद्यापीठ प्रशासनाला ही घटना समजल्यानंतर त्यांनी तातडीने सदर राज्याच्या गृह मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. अखेर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतरच शाहरूखची विमानतळावरून सुटका झाली. परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नामांकित भारतीय प्रवाशांना अडवून त्यांची चौकशी करायची आणि नंतर त्यासाठी माफी मागायची, हे आता अमेरिकेचे धोरण असल्याचे कृष्णा म्हणाले. यापूर्वीही २००९ साली शाहरूखला अमेरिकन विमानतळावर अडवून त्याची चौकशी कऱण्यात आली होती. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, भारताचे राजदूत यांनाही अमेरिकेच्या विमानतळांवर अडवून त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
