विवेकानंद महाविद्यालयाचा नॅकच्या ए ग्रेड मानांकनासह शासनाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेत समावेश

कोल्हापूर, दि. १२ – महाराष्ट्रात शाखा असणार्‍या आणि कोल्हापूरात मुख्यालय असलेल्या स्वामी विवेकानंद संस्थेच्या कोल्हापूरातील विवेकानंद महाविद्यालयास नुकत्याच झालेल्या काटेकोर पाहणीनंतर नॅकने ए ग्रेड मानांकन जाहीर झाले आहे, अशी माहिती प्राचार्य हिंदूराव पाटील यांनी दिली.
    केंद्र शासनाने जारी केलेल्या महाविद्यालयीन दर्जासुधार बाराव्या पंचवार्षिक योजनेत देशभरातून १०० महाविद्यालये निवडण्यात आली होती. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाअंतर्गत येत असलेल्या कोल्हापूरामधून एकमेव विवेकानंद कॉलेजचा समावेश होता. तर शिवाजी विद्यापीठातून एकूण चार महाविद्यालये या योजनेत निवडण्यात आली होती. यामध्ये सातार्‍याच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज व के. डब्ल्यू सी कॉलेज आणि सांगली जिल्हयातील शिवाजी कॉलेजचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात गेली ११ वर्षे सलगपणे सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असणारे महाविद्यालय म्हणून स्वामी विवेकानंद कॉलेजने आपला लौकिक कायम ठेवला आहे, अशी माहिती देत पाटील यांनी सांगितले की, इंग्लंडमध्ये होणार्‍या ऑलिम्पिकमध्ये जलतरणपट्टू वीरधवल खाडे आणि नेमबाजपट्टू राही सरनोबत हे विद्यार्थी देशाचे नेतृत्व करणार आहेत. ते आम्हा शिक्षण संस्थेला अभिमानास्पद आहे. तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी सेवा मोरे आणि भाग्यश्री बिडकर या मराठी चित्रपटात गाजत आहेत. या कलाक्षेत्रातील कार्याची दखल घेत युजीसीने शैक्षणिक एफ एम केंद्र सुरु करण्यास अनुकूलता दाखवली आहे, अशीही माहिती त्यांनी शेवटी दिली.