स्वाईन फ्ल्युचे एक तासात निदान करणारे यंत्र संरक्षण प्रयोगशाळेमध्ये विकसित

पुणे, दि.४- स्वाईन फ्ल्यू ला कारणीभूत होणार्‍या एचवन एनवन विषाणूचे निदान १ तासात करू शकणारे चाचणी यंत्र ग्वाल्हेरच्या डीआरडीओ म्हणजे केंद्रीय संरक्षणविभागाच्या प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले असून हे चाचणी यंत्र येत्या तीन महिन्यात बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पुण्यातील डीआरडीओ संस्थेतील मुख्य नियंत्रक (संशोधन विकास) डॉ. सेल्वरमूर्ती यांनी सांगितले.
    या विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की भविष्यकाळात जैविक युद्धात एचवन एनवन विषाणूचा वापर होऊ शकतो ही शक्यता गृहित धरून युद्धभूमीवरच त्वरीत या विषाणूची चाचणी करणारे चाचणी यंत्र हवे, या विचारातून या चाचणीयंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोलची पारंपारिक चिकित्सा पद्धतच आपल्याकडे वापरात आहे. मात्र ही पद्धत वेळखाऊ आणि खर्चिक आहे. डीआरडीओने तयार केलेले चाचणी यंत्र या सीडीसीच्या यंत्राच्या तुलनेत स्वस्तही आहे. हे यंत्र अवघ्या १४०० रूपयात मिळू शकणार आहे. पारंपारिक चाचणी पद्धतीत निदान होण्यास किमान आठ तासाचा अवधी लागतो तर डीआरडीओच्या चाचणी किटमुळे अवघ्या एक तासात एचवन एनवन विषाणू शोधणे शक्य होणार आहे. तसेच हे यंत्र खेडोपाडी कुठेही, विना विजेचे वापरता येणार असून चाचणी निदानाचा रिझल्ट पाहण्यासाठी मायक्रोस्कोपची आवश्यकता भासणार नाही तर नुसत्या डोळ्यांनीही हे पाहता येणार आहे. या किटच्या आत्तापर्यंत १ हजारापेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या असून त्याचे निकाल उत्तम आले आहेत. त्यामुळेच लष्कराबरोबरच नागरी आरोग्य क्षेत्रासाठीही हे यंत्र उपलब्ध केले जात आहे. एचवन एनवनच्या प्रसार झालेल्या शेजारील देशांतूनही याला मागणी आली आहे.
व्हँटाज इंटिग्रेटेड सिक्युरिटी आणि रास लाईफ सायन्सेस प्रा.लिमि.या नोईडा आणि हैद्राबाद येथील कंपन्यात या चाचणी यंत्राचे उत्पादन करर्‍यात येत असून नुकत्याच दिल्लीत झालेल्या डिफेन्स एक्स्पोमध्येही ते सादर करण्यात आले होते.