पुणे दि,३-लोकांना वाहतुकीसाठी सोय व्हावी म्हणून सेनेचे आमदार महादेव बाबर यांनीनी बुलडोझरच्या सहाय्याने हडपसर रस्त्यावरील एका पुलाखालचा रस्ता परवानगी न घेता उखडला महणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल आमदार बाबर यांच्यासह दोन नगरसेवकांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या तिघांनाही आज दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आमदार महादेव बाबर यांनी त्यांच्या समर्थकांसह स्वारगेट हडपसर मार्गावरील सोलापूररोड येथील उड्डाण पुलाखालील रोड डिव्हायडर बुलडोझरच्या सहाय्याने उखडून टाकला होता व रस्ता रूंदीच्या कामाला वेग यावा म्हणून आंदोलनही केले होते. त्यावरूनच त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीआरटी मार्गावरील या डिव्हायडरमुळे रस्ता आणखीनच अरूंद झाला असून तेथे वारंवार अपघात होतात व आत्तापर्यंत अशा अपघातांत ९० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार विनंत्या करूनही हा रस्ता रूंद केला जात नाही म्हणून आमदार बाबर यांनी हा डिव्हायडरच उखडून टाकला होता. बाबर यांच्या बरोबरच नगरसेवक प्रमोद भांगिरे आणि विजय देखमुख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पोलिसांनी सांगितले.
