साईबाबा संस्थानच्या माजी विश्वस्तांना उच्च न्यायालयाच्या नोटीसा

अहमदनगर, दि. ४ – शिर्डी येथील साईबाबा संस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे, उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासहीत सर्व विश्वस्तांना नोटीसा जारी केल्या असून तीन आठवड्यात खुलासा करण्याचा आदेश दिल्याने नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
शिर्डीच्या साईबाबा संस्थानमध्ये जिल्हा परिषद शाळांना बेंचकरीता ३५ कोटी रूपये, शिर्डीजवळ होत असलेल्या नियोजित काकडी विमानतळासाठी ५० कोटी रूपये, पालखी रस्ता तयार करण्यासाठी प्रत्यक्षात रस्ता तयार न करताच १ कोटी १२ लाख रूपयांचा निधी खर्च दाखविणे, प्रवास भत्ता घेताना वाहनांचे बनावट बोगस नंबर देऊन संस्थानकडून वाहन प्रवास भत्त्याचे पैसे उकळणे यासह तब्बल १४ प्रकरणांच्या विरोधात कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी बुधवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. भूषण गवई व न्या. सुनील देशमुख यांच्या न्यायालयात झाली. त्यावेळी खंडपीठाने सर्व माजी विश्वस्तांना नोटीस जारी करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने माजी विश्वस्तांना नोटीसला उत्तर देण्यासाठी ३ आठवड्यांचा अवधी दिला असून पुढील सुनावणी दरम्यान साईबाबा संस्थानमधील गैरव्यवहारासंदर्भात न्यायालयाकडून निश्चित आदेश दिला जाईल असा विश्वास याचिकाकर्ते संजय काळे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment